Pages

Friday, July 05, 2019

मृदगंध

मृदगंध हा फक्त पहिल्या पावसाच्याच वाटेला येतो ..त्या नंतर येणाऱ्या पावसाने कितीही जीव ओतला तरी पहिल्या पावसाची सर त्याला काही केल्या येत नाही!
दिनेश

Tuesday, July 02, 2019

पाऊस..सुरेश भट

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
*आवडेल मलाही पाऊस व्हायला …*

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श्वासात तुझ्या मिसळायला …
श्वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …
काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
*आवडेल मलाही पाऊस व्हायला …*

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..
तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला
*आवडेल मलाही पाऊस व्हायला …*

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …
आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
*आवडेल मलाही पाऊस व्हायला …*

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

भाळशील का तू माझ्या या रूपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …

*-सुरेश भट*

Friday, May 31, 2019

कैफ


रिचवले आहेत आम्ही ही प्याले कैक तुझ्या कैफाचे...
आज ढळला तोल पण सारे   वारेच  होते वादळाचे ..

देणे

नसेन प्राक्तनात मी तुझ्या जरीही
देणे माझे पण बाकी होते गतजन्मीचे
© दिनेशG

किनारे


माझेच आयुष्य ज्याला मी अजुनी कळलोच नाही
भावनांचा मी भुकेला या जगाचे भान नाही

दूर तेवणाऱ्या दिव्याची साद मोठी आर्त आहे
जाणिवांचा गंध नाही रात्र मोठी किर्र आहे

माझा न मी राहिलो मी सुटले सारे किनारे
मागू तुझ्याकडे आता कुठल्या जन्मीचे पुरावे

Monday, May 27, 2019

घंटानाद

गावी घराशेजारीच कुलदेवतेचे मंदिर आहे. गावी असल्यावर सकाळी आंघोळ आटोपल्यावर मंदिरात जाणे हा शिरस्ता. पण आज अचानक संध्याकाळी वाटले की देवळात जावे. देवळात गेलो तेव्हा आत बसलेल्या एक दोन माणसांशिवाय कुणीच नव्हते. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी दोन घंटा टांगलेल्या आहेत. प्रवेश करतानाच मी ठरवले होते की फक्त एकदाच हलकीशी घंटा वाजवायची. त्याप्रमाणे अगदी हलक्या हाताने एकदा घंटानाद करून मी गाभाऱ्यात गेलो. प्रवेशद्वार ते गाभारा अंदाजे पन्नास साठ फुटाचे अंतर आहे.  देवीसमोर हात जोडताना लक्षात आले की सतत घंटानाद होतोय. मागे वळून पाहिले तर  कुणीच नव्हते पण प्रवेशद्वारापाशी असलेल्या त्या दोन घंटा एकमेकाला आपटून सतत घंटानाद होत होता. मी घंटा वाजवताना अजिबात हेलकावे दिले नव्हते हे मला स्पष्ट आठवत होते. उलट मी खूप हळुवार पणे घंटा वाजविली होती. तरीपण त्या आजूबाजूला टांगलेल्या दोन्ही घंटा आडव्या हेलकावे खात एकमेकाला आपटत सतत घंटानाद होत होता. मी नमस्कार करून प्रदक्षिणा पूर्ण केली व गाभाऱ्यातून सभामंडपात येऊन बसे पर्यंत घंटानाद चालू होता. म्हणजे  जवळजवळ चार मिनिटे तरी नक्कीच! तो संपूर्ण वेळ मी डोळ्यातील पाणी थोपवत देवीच्या आशिर्वादाची अनुभूती घेत होतो.

Sunday, May 26, 2019

प्राजक्ताचा सडा

जमिनीवरचा तो  प्राजक्ताच्या फुलांच्या सडा मला नेहमी प्रश्न विचारतो- बघ उमजते का तुला माझ्या एका रात्रीच्या आयुष्यातले गंधीत मर्म!
©दिनेश